परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं पण जिद्द नाही….
महागाव/ रवी गवळी…….🖋️
शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं नेहमी म्हटलं जातं. शिक्षण घेईल तेवढे कमीच आहे. व्यक्ती सतत काही ना काही शिकत असल्याने तो आयुष्यभर विद्यार्थीच असतो. वयाच्या पन्नाशी नंतर सहसा कोणीही अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा विचारही करत नाही पण महागाव (ता. गडहिंग्लज )येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागात थेट द्वितीय वर्षात शिकत असलेला चोपन्न वर्षीय यल्लाप्पा पुजारी हा विद्यार्थी मात्र याला अपवाद आहे. कारण या वयात ते खंड पडलेल्या तेहतीस वर्षानंतर पुन्हा अभियांत्रिकीचे नियमित शिक्षण चालू करून अर्धवट शिक्षणाची इच्छा पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे एकही दिवस न चुकवता कॉलेजला हजर राहून सर्व कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेत आहे. त्याचा या वयातील उत्साह आजच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

यल्लाप्पा याचे गाव बेळगाव जिल्ह्यातील कांग्राळी बुद्रुक हे आहे. पिढ्यांनपिढ्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची व भूमिहीन अशी आहे. पण शालेय शिक्षणात अत्यंत हुशार इयत्ता दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर १९९१ मध्ये बेळगाव येथील शासकीय कॉलेजमधून अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबात पहिला सर्वाधिक शिक्षण घेणारा ठरला आहे.पुढील शिक्षणासाठी मात्र आर्थिक गरज पडणार होती कौटुंबिक परिस्थिती पाहता मनात शिक्षणाची इच्छा असूनही पदवीचे शिक्षण पूर्ण करणे राहूनच गेले. परिस्थितीशी झुंजत मामाचे गावी चंदगड तालुक्यातील कामेवाडी व कोवाड परिसरातील इमारत डिझाईन, शासकीय कामाचे सर्वे करणे अशा छोटे-मोठे काम उदरनिर्वाह चालू ठेवला. दरम्यान मुलगी नम्रता हिचे आर्किटेक्चर मधून शिक्षण पूर्ण करून घेतले माझ्याकडे मिळणाऱ्या कामास तिची मोठी मदत मिळाली पण अर्धवट राहिलेली शिक्षणाची खंत मात्र कायमच मनात घोंगावत राहिला होता. शिक्षणाची आस व मुलीची आग्रह यामुळे पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवून महागावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतला. यापुढेही अभियांत्रिकेतील पदव्युत्तर व उच्च शिक्षण ही पूर्ण करून अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची उणीव दूर करणार आहे.

त्यानुसार यल्लाप्पा यांनी ऑगस्टमध्येच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेतली जेव्हापासून कॉलेजला सुरुवात झाली तेव्हापासून एकही दिवस न चुकता दररोज हजर राहून पहिल्या बेंचवर बसून अध्ययन, प्रॅक्टिकल करत आहे. शिवाय कॉलेजमधील वेगवेगळ्या उपक्रमात ही हिरीहिरिने सहभाग घेत असतात.

आपल्याकडील अनुभवाचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत ऑफ तासिका वेळी ग्रंथालयातील अभ्यासिकेत अवांतर पुस्तके वाचनात वेळ घालवून सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे..
……………………………………………………………..
शिक्षणामुळे माझ्या जगण्याला नवीन ऊर्जा मिळाली

यावेळी यल्लाप्पा पुजारी म्हणाले ” माझी शिक्षणाची आवड एसजीएमच्या उंबऱ्यापर्यंत घेऊन आली. या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यामुळे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे वयाने जरी मोठा असलो तरी येथे शिक्षण घेताना कोणतीच अडचणी येत नाही. उलट येथील वर्गमित्र, शिक्षकांनी मला खूप मोठा सहकार्य करीत आहेत. शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा प्रत्यक्ष अनुभवाने माझ्या जगण्याला नवीन ऊर्जा मिळत आहे. शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे की ते कोणीही चोरू शकणार नाही. वेळेचा सदुपयोग करून कोणतीच न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावरच विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी इतर

विद्यार्थ्यांना दिला…
त्यांना प्राचार्य एस.एच. सावंत, विभाग प्रमुख एस. एल. गावडे, प्रा. ए. पी. मेहंदळे, प्रा. एम. डी.खोत,प्रा. जे. ओ. ओझा,प्रा. एस. पी. देशमुख,प्रा. ए. ए. देवर्डे,प्रा.महेश नरेवाडी याबरोबरच प्रा. कल्याणी चव्हाण, प्रा.अतुल देशपांडे,ग्रंथपाल प्रा. संभाजी चव्हाण प्रा. अजित

मगदूम व सह इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.